प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन| प्रशासनाचा निषेध; घोषणांनी परिसर दणाणून सोडला

2

वैभववाडी/प्रतिनिधी : गाव आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच…कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही… दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे… आमच्या मागण्या मान्य करा…नाहीतर खुर्च्या खाली करा. आदी घोषणा देत अरुणा प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाचा निषेध करीत परिसर दणाणून सोडला.
अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने गुरूवारी सकाळी तहसिल कार्यालयाच्या आवारात बसून आंदोलन सुरू केले. अरुणा प्रकल्पग्रस्तांना भूखंड नाही, मोबदला नाही, पर्यायी शेत जमिनीचा पत्ता नाही, पुनर्वसन गावठाणात अद्यापही प्राथमिक सुविधा नाही. अप्पर जिल्हाधिका-यांनी १७ जून रोजी गाव खाली करण्याची नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावणा-या अप्पर जिल्ह्याधिका-यांचे डोके ठिकाणावर आहे का? भर पावसात आम्ही जायचे कुठे? राहायचे कुठे? घळभरणीसाठी धरण समितीचे पुढारी व प्रकल्प अधिकारी यांच्यामध्ये झालेला गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी.
तसेच जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी गुरूवारी सकाळी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत जोरदार घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनात शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. या आंदोलनात तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, विलास कदम, सुरेश जाधव, सखाराम जाधव, विजय भालेकर, वामन बांद्रे, ज्ञानदेव चव्हाण, लता बांद्रे, सुनंदा जाधव, सगुणा चव्हाण, प्रभावती बांद्रे, आरती कांबळे, सुभाष कांबळे, गजानन सुर्यवंशी, विश्वास जांभळे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

55

4