मुंबई, ता. २७ : विधानभवन येथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासंदर्भातील आढावा बैठक सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत आमदार वैभव नाईक यांनी मुंबई गोवा महामार्गाची झालेली दयनीय अवस्था ना. चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. गेल्या १५ दिवसात महामार्ग चौपदरी करणासंदर्भात वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे पुराव्यासाठी सादर केली. महामार्गाची वाताहत होण्यास सर्वस्वी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदार कंपनी कारणीभूत आहेत. लोकांना जीव धोक्यात घालून महामार्गवरुन प्रवास करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समक्षच आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱयांना धारेवर धरत जाब विचारला.तसेच लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही आमदार वैभव नाईक यांनी श्री पाटील यांच्याकडे केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी , आमदार सदानंद चव्हाण, आमदार भास्कर जाधव,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सहाय्यक सुधीर देऊळकर, यासह महामार्ग प्राधिकरणचे प्रमुख अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे मालक प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पातंर्गत पनवेल ते इंदापूर व इंदापूर ते झाराप पर्यंतच्या कामाचा संपूर्ण आढावा या बैठकीत घेण्यात आला.याप्रसंगी आमदार वैभव नाईक व इतर आमदारांनी महामार्गाच्या सध्यस्थितीची माहिती करून देताना महामार्गासाठी वापरलेला मातीचा भराव खचुन रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पर्यायी मार्गावर देखील खड्डे पडले आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत आहे. पावसामुळे मातीचा भराव रत्स्यावर वाहून येत असल्याने महामार्ग चिखलमय होऊन वाहतुकीस धोकादायक बनला आहे. यामुळे अनेक अपघात होत आहे. चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराने केलेल्या हलगर्जीपणामुळे नागरीकांकडून आंदोलने केली जात आहेत.याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे लक्ष वेधले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आठ दिवसात महामार्ग सुस्थितीत करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले. तसेच पुढील महिन्यात मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी साठी व प्रत्यक्ष कामाचा आढावा घेण्यासाठी आपण महामार्ग पाहणी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले . गणेशोत्सव सण जवळ येत असल्याने मुंबई वरून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गाचा त्रास होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सूचना ना. चंद्रकांत पाटील यांनी अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या मालक प्रतिनिधीना केल्या आहेत.