उमेश तोरसकर : दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
दोडामार्ग, ता.२८ : पत्रकारिता क्षेत्रात करियरच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच युवकांनी य़ा क्षेत्रात यायला हवे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर यांनी येथे केले.
विचारवंत आणि विद्यार्थी निष्पाप मनाचे असतात. त्यामुळे राजकारण्यांना जशी पत्रकारांची भीती वाटते तशी त्यांना वाटत नाही. तुम्ही असेच निष्पाप रहा असे आवाहनही श्री. तोरसकर यांनी केले.
दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्यावतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी (ता .27) झाला. सर्वसाधारण विद्यार्थ्याबरोबरच विशेष मुलांचाही गौरव यावेळी पत्रकार समितीने केला. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक शाळेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना आणि चार विशेष (दिव्यांग) विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्रक आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष अँड. संतोष सावंत, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय देसाई, कुंब्रलचे सरपंच प्रवीण परब, पंचायत समिती सदस्य धनश्री गवस, प्रभारी प्राचार्य संगीता वाघमोडे, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रभाकर धुरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास देसाई, पत्रकार संदीप देसाई, लखू खरवत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला.
श्री. परब यांनी पत्रकार समितीने एका सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे सांगून विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्याचे आवाहन केले. प्रत्येक व्यक्तीचा बुद्ध्यान्क सारखा असतो असे तत्ववेत्ते सांगतात. त्यामुळे त्याचा वापर कुठे आणि कधी करायचा हे ज्याला कळते तो आयुष्यात यशस्वी होतो. तुम्हीही तुमचे ध्येय निश्चित करा. प्रशासकीय अधिकारी बनण्याचा प्रयत्न करा असेही ते म्हणाले.
अँड. संतोष सावंत म्हणाले, शाळकरी वयापासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा, अनेकांचे विचार ऐका, आपले गुरु पालक, मार्गदर्शक यांचे ऐकायला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागायला शिका. पत्रकारितेत या, आयुष्यात योग्य उंची गाठण्यासाठी मेहनत करा.
सौ. गवस म्हणाल्या, नेहमी मोठी स्वप्न पाहा. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत करा. जिद्द, चिकाटीच्या जोरावर ध्येय गाठा. सौ. वाघमोडे म्हणाल्या, पत्रकार समितीने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला. पत्रकार हा आपल्यामधला दुवा असतो. चांगल्याची भलावण आणि वाईटावर प्रहार करण्याचे काम पत्रकार करतात. त्यांच्यामुळेच तुम्ही मिळवलेले यश, तुमचे कार्य समाजाला कळते आणि तुमची ओळख समाजाला होते.
श्री. धुरी यांनी प्रास्ताविक केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर केल्याने त्यांनाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल. असा सत्कार आपलाही व्हावा या विचाराने प्रेरित होवून विद्यार्थी जोमाने अभ्यास करती. यासाठी दोडामार्ग प्रशाळेत कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगून प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी असते. प्रत्येकात अद्वितीय गुणवैशिष्ट्ये आणि क्षमता असतात. तुम्हीही तुमच्यातील क्षमता ओळखून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करा, असे आवाहनही श्री. धुरी यांनी केले.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष तेजस देसाई, सहसचिव संदेश देसाई, कार्यकारिणी सदस्य रत्नदीप गवस, वैभव साळकर, गणपत डांगी, साबाजी सावंत, महेश लोंढे, गजानन बोन्द्रे, समीर ठाकूर, प्रथमेश सावंत, जनार्दन परब, सुदेश नाईक आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. साळकर यांनी तर आभार श्री. धुरी यांनी मानले. जिल्हास्तरीय जीवनगौरव पत्रकार पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार पांडुरंग सहस्रबुद्धे यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.
असे भाग्य क्वचितच !
आयुष्यभर पत्रकार राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमांना वृत्तसंकलनासाठी उपस्थित असतात. पण त्यांच्याकडून कधी पत्रकारांबद्दल चांगले बोलले जात नाही; पण त्याला पंचायत समिती सदस्य धनश्री गवस अपवाद ठरल्या. त्यांनी व्यासपिठावरुन पत्रकारांच्या अनेक चांगल्या कामांचे कौतुक जाहीरपणे केले. असे भाग्य पत्रकारांना क्वचितच लाभते असे मत मांडून श्री. साळकर यांनी पत्रकारांच्या मनातील सल व्यक्त केली.