येत्या २४ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज…
मुंबई/अजित जाधव ता.२८: गेली अनेक दिवस पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईकरांची प्रतिक्षा संपली आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार बॕटींग केली. मुंबईतल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुंबईकर सुखावला आहे. तर येत्या २४ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईसह अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, दादर, घाटकोपर, मुलूंड, चर्चगेट, पालघर, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई अशा पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाऊस सुरू आहे. जून महिना संपत आला तरी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमाध्येही जुलै महिना अखेरपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईकरांवरही ‘पाणीबाणी’ च संकट ओढवल आहे. त्यामुळे पावसाने लावलेली हजेरी मुंबईकरांना दिलासा देणारी आहे.