वेंगुर्ले, ता. २८ : तालुका कृषी विभाग, पंचायत समिती वेंगुर्ला, कृषी विभाग राज्यशासन व ग्रामपंचायत वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषिदिनानिमित्त १ जुलै २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सुरंगपाणी, वायंगणी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, उपसभापती स्मिता दामले, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, समिधा नाईक, प्रितेश राऊळ, दादा कुबल, सुनील म्हापणकर, पंचायत समिती सदस्य यशवंत परब, साक्षी कुबल, गौरवी मडवळ, प्रणाली बंगे, अनुश्री कांबळी, श्यामसुंदर पेडणेकर, सिद्धेश परब, मंगेश कामत, उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला कृषी विभागाकडील विविध योजनांबाबत शास्त्रज्ञ, अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शेतकरी बागायतदार यांनी या कृषी मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समिती गटविकास अधिकारी व्ही. एस. सुतार, तालुका कृषी अधिकारी आर. डी. कांबळे, वायंगणी सरपंच सुमन कामत यांनी केले आहे.
जिल्हा परिषद वाढीव उपकर उत्पन्नातील योजना सन २०१९-२० व डी बी टी प्रक्रियेअंतर्गत प्लास्टिक ताडपत्री, गवत कापणी यंत्र, नारळ सीडी प्लास्टिक क्रेटस, गार्डन पाईप, १ एच पी इलेक्ट्रिक पंप, १.५ एच पी डिझेल इंजिन, ३ एच पी इलेक्ट्रिक पंप, पोर्टेबल पॉवर स्प्रे, नॅपसॅक स्प्रे पंप या कृषी विषयक बाबींचे पंचायत समिती वेंगुर्ला याठिकानी अर्ज मागविण्यात आले आहेत. १५ जुलै पर्यंत हे अर्ज पंचायत समिती कृषी विभाग यांच्याकडे द्यावेत या नंतर आलेल्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी विचार केला जाणार नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.