वामन हरी पेठेसह अनेक दुकानांत मारला होता डल्ला
कणकवली, ता. २८ : कणकवली शहरातील वामन हरी पेठे, सावंतवाडी शहरातील पेडणेकर ज्वेलर्स तसेच रत्नागिरी शहरातील सराफी दुकानांमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या महिलेला आज पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. शापा रमेश भैसडे (वय 60) असे तिचे नाव आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाने ही कारवाई केली.
कणकवली शहरातील वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये 28 डिसेंबरला शापा भैसडे आणि तिच्या सहकार्याने ज्वेलर्समधील कर्मचार्यांना बोलण्यात गुंग ठेवून सोन्याचे दागिने लंपास केले होते. तर सावंतवाडीतील पेडणेकर ज्वलेर्समध्ये 17 एप्रिल रोजी असाच प्रकार या महिलेने केला होता. याखेरीज रत्नागिरी शहरातील ज्वेलर्स दुकानात या महिलेसह तिच्या सहकार्याने सोन्याचे दागिने लंपास केले होते. या टोळीमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलिस अधीक्षक निमित गोयल यांच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पोलिस कॉन्स्टेबल रविराज फडणीस, संकेत खाडये, रवी इंगळे, आशिष गंगावणे, प्रतीक्षा कोरगावकर या पथकाने पुणे येथे जाऊन त्या महिलेला आज ताब्यात घेतले.