कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा : भास्कर जाधव

190
2
Google search engine
Google search engine

 

औचित्याच्या मुद्दयाद्वारे विधानसभेत मागणी

मुंबई, ता. २८ : स्वतंत्र विदयापीठासाठी कोकणातील सर्व महाविदयालये सकारात्मक आहेत. शिक्षणप्रेमींकडूनही स्वतंत्र विदयापीठाच्या मागणीला मोठया प्रमाणात समर्थन मिळत आहे. त्यामुळे सोलापूर, नांदेड, गडचिरोली, जळगावच्या धर्तीवर मुंबई विदयापिठाचे विभाजन करून कोकणसाठी स्वतंत्र विदयापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे आज विधानसभेत केली.
७६४ महाविदयालये संलग्न असलेल्या मुंबई विदयापीठाच्या प्रशासनावर ताण आहे. त्यामुळे विदयापीठाच्या कार्यक्षमतेविषयी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पेपरफुटीचे अनेक प्रकार,उशिरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेला विलंब आणि परीक्षांच्या आॅनलाईन निकालांमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याने विदयापीठाची अक्षरशः बेअब्रू झाली आहे असेही भास्करराव जाधव यांनी स्पष्ट केले.
या सर्व प्रकारांमुळे सध्या मुंबई विदयापीठात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याचा फटका कोकणातील विद्यार्थ्यांना बसला असून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मुंबई विदयापीठाचे विभाजन करून स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी कोकणातील शिक्षणप्रेमी नागरिक, संस्था आणि विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्हयातील ४५ सिंधुदुर्ग जिल्हयातील ३८ आणि दक्षिण रायगडमधील २० अशा १०३ महाविदयालयांकरिता स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करणे शक्य आहे.
स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास कोकणातील स्थानिकांच्या गरजेप्रमाणे सुसंगत असे रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करणे शक्य होईल असेही भास्करराव जाधव यांनी सभागृहात सांगितले.