तर ठेकेदार, महामार्ग अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा…

2

पालकमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा; महामार्गाची पाहणी…

कणकवली, ता.29 ः महामार्ग ठेकेदाराचा नियोजन शून्य कारभार आणि महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. जिल्ह्यातील संपूर्ण महामार्ग येत्या पंधरा दिवसांत सुस्थितीत ठेवा. तसेच अपघात होऊन जीवित हानी झाली तर महामार्ग चौपदरीकरणाचे दोन्ही ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करू असा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिला. याखेरीज महामार्गाची दुरवस्था कायम राहिली तर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि आरटीओ यांनीही ठेकेदार आणि महामार्ग विभागाला नोटिसा द्याव्यात असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या स्थितीची पाहणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज केली. त्यानंतर कणकवलीतील शासकीय विश्रामगृहात त्यांनी चौपदरीकरण कामाचा आढावा घेतला. या बैठकीला आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, अतुल काळसेकर, नागेंद्र परब, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, महामार्ग प्राधिकरण अधीक्षक अभियंता विवेक नवले, महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता सलीम शेख, सहाय्यक अभियंता प्रकाश शेडेकर, प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते, कुडाळ प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, नायब तहसीलदार आऱ जे पवार, कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व विविध विभागाचे अधिकारी व बाळू मेस्त्री, रूपेश आमडोस्कर, अ‍ॅड विलास परब आदींसह नागरिक उपस्थित होते.
मुंबई गोवा महामार्गाची स्थिती पाहून पालकमंत्री ठेकेदार आणि महामार्ग अधिकार्‍यांवर संतापले. कणकवली शहरातील महामार्ग पुढील तीन दिवसांत सुस्थिती झाला पाहिजे. तर कुडाळ ते खारेपाटण पर्यंतचा महामार्ग पंधरा दिवसांत निर्धोक व्हायला हवा. तसेच धोकादायक बांधकामे काढून टाका. गटारांची कामे तातडीने हाती घ्या. तसेच जेथे रस्ता खचण्याची शक्यता आहे तेथे तातडीने उपाययोजना करा असेही निर्देश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा बैठकीत दिले.

चतुर्थी पूर्वी महामार्ग सुरळीत व्हायलाच हवा
येत्या पंधरा दिवसांत मुंबई गोवा महामार्ग सुस्थिती व्हायला हवा. त्याचबरोबर गणेशचतुर्थीपूर्वी सर्व्हिस रोड, गटारे, महामार्गालगत वाहने उभी करण्यासाठीची व्यवस्था, अर्धवट गटारे, नाले यांचीही कामे पूर्ण व्हायला हवीत. त्याअनुषंगाने परिवहन विभाग, महसूल, महामार्ग प्राधिकरण यांनी एकत्रित येऊन आराखडा तयार करा. त्याचा अहवाल आपणाला द्या असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

12

4