अनेक घरांमध्ये पाणी घुसले :महामार्ग ठेकेदाराच्या दर्जाहीन कामाचा सर्वसामान्यांना फटका
कणकवली, ता. 30: गेले दोन दिवस कोसळत असलेल्या धुवाधार पावसामुळे कणकवली शहर आणि परिसरातील अनेक घरांमध्ये आज पाणी घुसले. महामार्ग ठेकेदाराने नाल्यांची कामे चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
शहरातील प्रांत कार्यालयासमोरचा नाला ठेकेदाराने माती टाकल्यामुळे बंद झाला. त्यामुळे जळकेवाडी तील आणि विद्या नगर भागातील अनेक घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला होता. याखेरीज शहरातील सखल भाग असलेला बांधकर वाडी, रेल्वे स्टेशन पूल येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दरम्यान शहरातील प्रांत कार्यालयाकडील नाला मोकळा करण्यासाठी नगरपंचायतीचे पथक तसेच नगरसेवकांनी धाव घेतली होती. शहरातील एसटी कार्यशाळा येथेही पाणी तुंबल्याने अनेक घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला होता. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने गड आणि जाणवली नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.