होडावडा पुलावर पाणी आल्याने वाहतूक सकाळच्या सत्रात ठप्प
वेंगुर्ले : ता.३० शनिवार पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यात काही ठिकाणी पुर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तर होडावडा- तळवडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी ला जाणारी वाहतूक सकाळच्या सत्रात पूर्णपणे ठप्प होती.
तालुक्यातील होडावडा- तळवडे गावांना जोडणाऱ्या नदीच्या पुलावरून रविवारी पहाटेपासून पाणी आले होते. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. तसेच यामुळे सावंतवाडी व वेंगुर्ला एसटी च्या फेऱ्या मातोंड मार्गे वळवण्यात आल्या होत्या. दरम्यान सकाळी १० नंतर पुलावरील पाणी ओसरल्याने वाहतुकीस मार्ग सुरळीत झाला. रात्री १ वाजल्यापासून घडघडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे तळवडे पंचक्रोशीतील सर्वच ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. वेंगुर्ला- होडावडा तळवडे सावंतवाडी या मार्गे जाणारी वाहतूक मातोंड मार्गे वळवण्यात आली. सकाळपासून च्या सावंतवाडी व वेंगुर्ला जाणाऱ्या एस टी फेऱ्याही मातोंड मार्गे वळविण्यात आल्या होत्या. सकाळी १० नंतर नदीतील पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान या मुसळधार पावसाने नदी, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसानही झाले. काही ठिकाणी भात शेतीची काढलेली रोपे पाण्यामुळे वाहून गेल्याच्या घटना घडल्या. काही दिवसांपूर्वी पडणाऱ्या पावसामुळे मुबलक पाणी साठा झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला होता. मात्र या दोन दिवस लागलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.