ठिक-ठिकाणी पडझड; खोक्रल येथे घराची भिंत कोसळली…
दोडामार्ग ता.३०: तालुक्याला मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी झोडपून काढले.सतत दोन दिवस पावसाची संततधार सुरूच असल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.खोक्रल येथे घराची भिंत कोसळून लाखोची हानी झाली.सततच्या पावसामुळे तिलारी नदी बरोबरच तालुक्यातील इतर नद्या नाल्यांनाही पूर आला आहे.त्यामुळे घोडगेवाडी,कुडासे वानोशी,साटेली-भेडशी,आयी,भटवाडी व मुळस-हिवाळे काॅजवे पाण्याखाली गेला आहे.
दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मान्सून सक्रिय झाल्याने तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. शेतकरी या पावसामुळे सुखावला असून शेतीच्या कामांना उशिरा का होईना मात्र वेग आला आहे. असे असले तरी मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसाची रविवारीही संततधार सुरूच होती. त्यामुळे तालुक्यातील तिलारी नदी बरोबरच मुळस, साटेली-भेडशी नदी व इतर नद्या-नाल्यांना पूर आला. त्यामुळे तिलारी नदीवरील कुडासे-वानोशी, घोडगेवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. तर घोडगेवाडी-भटवाडी कॉजवेवर देखील पाणी आल्याने वाहतूक खोळंबली आहे.मुळस-हेवाळे नदीला देखील पूर आल्याने हा कॉजवेदेखील पाण्याखाली गेल्याने हेवाळे गावाचा संपर्क तुटला आहे. तर आयी गावातील नदीलाही पूर आल्याने कॉजवे पाण्याखाली जाऊन किटवाडी व गोसावीवाडीचा गावांशी असलेला संपर्क तुटला आहे.
या संततधार पावसामुळे खोक्रल येथे घराची भिंत कोसळून लाखोची हानी होण्याची घटना घडली. सुधाकर भिकाजी गवस यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सदरची भिंतही बाजूच्या सुनिता शांताराम गवस यांच्या घराशी संलग्न होती. मात्र तीच भिंत कोसळल्याने सुनिता गवस यांच्या घरालाही आता धोका निर्माण झाला आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाने उसंत घेतली नव्हती.
बॉक्स-दूरध्वनी यंत्रणा ठप्प
या मुसळधार पावसाचा फटका तालुक्यातील बी. एस. एन. एल. च्या दूरध्वनी यंत्रणेलाही बसला. संपूर्ण दिवसभर तालुक्यातील दूरध्वनी यंत्रणा ठप्प होती.
फोटो- मुसळधार पावसामुळे खोक्रल येथील घराची भिंत कोसळून नुकसान झाले.