नितीन गडकरींचा विश्वास : काम लांबण्यास ठेकेदाराचा कोणताही दोष नाही
दिल्ली, ता. १ : मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे या कामाला उशिर लागत आहे. यात ठेकेदाराचा कोणताही दोष नाही. सिंधुदुर्ग ते गोवा हा पट्टा डिसेंबर अखेरपर्यंत चौपदरी होणार आहे, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभागृहात केला.
मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्षे रखडला आहे. त्याचे काम कधी पूर्ण होईल असा प्रश्न शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी सभागृहात विचारला होता. यात ठेकेदाराच्या चुकीमुळे हे काम रेंगाळले आहे. त्यामुळे अनेक लोकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे असे सांगून त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. प्रत्युत्तर देताना श्री. गडकरी म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात हा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळला होता. त्यांचे पाप आज मी झेलत आहे. आमच्याकडे सत्ता आल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची तयारी दर्शविली, कोण ठेकेदार येण्यास तयार नव्हता. स्टेट बँकेचे कर्ज देतो असे सांगून एका ठेकेदाराला धरून आणले. आणि त्याच्या मार्फत आता हे काम सुरू आहे. पर्यावरण परवानग्या, जिल्हाधिकारी परवानगी, विजेचे खांब, लोकांकडून काम बंद अशा अनेक समस्यांमुळे हे काम रेंगाळले आहे. त्यात ठेकेदाराचा काही दोष नाही. आमच्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबर अखेर पर्यंत हे काम पूर्ण होईल. यात काही शंका नाही, असा विश्वास श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.