खास स्विमींग टँकची सुविधा : काही दिवसात सुरू होण्याची शक्यता
सावंतवाडी / अमोल टेंबकर, ता. ०१ : येथील पालिकेच्या शिल्पग्राम प्रकल्पाने कात टाकली आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी हा प्रकल्प सज्ज झाला आहे. विशेषकरून त्यात स्विमींग टँकची मजा पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
भाड्याची रक्कम मोठी असल्याने पालिकेसह पर्यटनाला पांढरा हत्ती ठरलेला हा प्रकल्प येत्या महिन्याभरात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. सावंतवाडी पालिकेच्यावतीने तत्कालीन नगराध्यक्ष दिपक केसरकर यांच्या काळात हा प्रकल्प राबविण्यात आला होता. लाकडी खेळणी, मातीची भांडी, दगडाच्या वस्तू आदीसह स्थानिक कला या शिल्पग्रामच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश होता. काही दिवस हा प्रकल्प चालला. परंतू त्यानंतर त्याला अवकळा प्राप्त झाली. दरम्यानच्या काळात एका बड्या हॉटेल उद्योजकाकडून हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतू भाड्याची रक्कम जास्त असल्याने त्यांनी तो प्रकल्प गुंडाळला.
आता पुन्हा मुंबईस्थित एका व्यावसायिकाकडून हा प्रकल्प चालविण्यासाठी घेण्यात आला आहे. त्यासाठी शिल्पग्राममध्ये खास स्विमींग टँक उभारण्यात आले आहेत. रहाण्यासाठी असलेले रुम अद्ययावत करण्यात आले आहेत. रेस्टॉरंटची सोयसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प येत्या काळात सावंतवाडीच्या विकासात मैलाचा दगड ठरेल असा विश्वास आहे.