मालवण,ता.०१: प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात येथील भंडारी हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकाविला. या प्रशालेने सादर केलेल्या कल्पना खुळी, अंधश्रद्धेचा बळी या एकांकिकेची निवड कणकवली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय नाट्योत्सवासाठी करण्यात आली आहे.
मालवण येथे राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२३-२४ अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव घेण्यात आला. या विज्ञान नाट्योत्सवाचे उदघाटन पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांच्या हस्ते झाले.
या विज्ञान नाट्योत्सवात भंडारी हायस्कुलने सादर केलेल्या “कल्पना खुळी, अंधश्रद्धेचा बळी ” या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. या नाटिकेचे दिग्दर्शन प्रफुल्ल देसाई यांनी केले होते. या नाटिकेत भावेश वराडकर, सर्वेश करंगुटकर, कृष्णा मांजरेकर, हर्षद सांडव, विश्वदिप बनसोडे, पारस मेस्त्री, भुवन सारंग, देवांग चव्हाण या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या नाट्योत्सवाचे परीक्षक म्हणून हौशी रंगभूमीवरील अभिनेत्री सुजाता शेलटकर, रंगकर्मी गणेश मेस्त्री यांनी काम पाहिले. भंडारी हायस्कुलच्या या नाटिकेची निवड ३ ऑक्टोबर रोजी कणकवली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवासाठी करण्यात आली आहे. यावेळी विस्तार अधिकारी उदय दीक्षित, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, आर. डी. बनसोडे, अरविंद जाधव, संदीप अवसरे, परीक्षक गणेश मेस्त्री, सुजाता शेलटकर आदी उपस्थित होते.
यावेळी विस्तार अधिकारी श्री. दीक्षित यांनी भंडारी हायस्कूलच्या संघाचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी अभिनंदन केले आहे.



