Friday, July 25, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामॉर्गोक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची कायदेशीर चौकशी करून कारवाई करा...

मॉर्गोक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची कायदेशीर चौकशी करून कारवाई करा…

 

भुषण आंगचेकर; अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर…

वेंगुर्ले,ता.२१: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैधरित्या जमीन खरेदी-विक्री करून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार करून महसूल विभागाची फसवणूक करणाऱ्या मॉर्गोक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी येत्या १५ ऑगस्टला उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भुषण आंगचेकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
मॉर्गोक्स हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सन २००७ साला पासून साधारणपणे २०१२-१३ सालापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यातील आडबंदर, मोर्वे, हिंदळे या गावामध्ये तसेच वेंगुर्ले तालुक्यातील मौजे भोगवे गावामध्ये तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी नोंदणीकृत खरेदीखताने खरेदीत घेतलेल्या आहेत. सदर कंपनीने धारण केलेले क्षेत्र हे बेकायदेशीर असून देखील सदर कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरेदीत घेतलेल्या शेतजमिनीबाबत केलेली विक्री व्यवहार व आजरोजी त्यांच्या नावे धारण असलेले क्षेत्र हे अवैध व बेकायदेशीर असून त्याबाबत चौकशी होऊन कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. याकरिता भुषण आंगचेकर यांनी दिनांक २ सप्टेंबर २०२४ व १३ सप्टेंबर २०२४ व दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते भुषण आंगचेकर यांनी आता १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
भुषण आंगचेकर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,  मॉर्गोक्स हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मौजे भोगवे, तालूका वेंगुर्ला येथील सर्व्हे नं. ४४ हिस्सा नं. १ व सर्व्हे नं. ४५ हिस्सा नं. ५अ या दोन्ही मिळकती या श्री. यशवंत अमरलाल ठक्कर, राहाणार 128, सत्याग्रह छावणी, जोधपूर अहमदाबाद, गुजरात याना दिनांक 12/09/2024 रोजीच्या खरेदीखताने विक्रीत दिलेल्या आहेत. सदरचे खरेदीखत दुय्यम निबंधक वेंगुर्ला यांचे कार्यालयात दिनांक 12/09/2024 रोजीने दस्त क्रमांक 845/2024 ने नोंदले गेले आहे.प्रत्यक्षात सदरचा व्यवहार हा महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63, 63-1A मधील तरतुदींच्या विरुद्ध असून पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सबब सदर बेकायदेशीर व्यवहाराची चौकशी करणेबाबत मी आपणाकडे तक्रार अर्ज दिलेला आहे व आपली प्रत्यक्ष भेट घेतली असता आपणाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी नंतर कारवाई करतो असे मला सांगण्यात आले होते.
त्याप्रमाणे पुढे सदर हस्ताप्रमाणे भोगवे फेरफार क्रमांक १५९८ ची नोंद ही मंडल अधिकारी परुळे यांनी रद्द देखील केलेली होती. परंतु त्यानंतर आता मला असे समजले आहे की सदर नोंदीचे पुनर्विलोकन करून ती मंजुर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांनी मंडल अधिकारी परळे यांना दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजीच्या आदेशाने कळविले आहे. याबाबत संबंधीत खरेदीदार व विक्रीदार यांचेकडून दबाव आलेला असून त्याप्रमाणे पुन्हा मंडल अधिकारी हे नोंद पूनर्विलोकनास घेऊन मंजूर करण्याच्या तयारीत असल्याचे समजून आले आहे.तसेच मी आपणाकडे तक्रार करनही आपणाकडून सदरप्रमाणे झालेल्या बेकायदेशीर खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याबाबत अद्यापही आपल्या स्तरावर कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमिनींचे असे बरेच गैरव्यवहार झालेले आहेत व सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भूमाफीयांच्या घशात घालण्याचे काम राजरोसपणे चालू आहे. हे सर्व गैरव्यवहार हे महसुल प्रशासनाच्या पाठींब्यानेच चालु असल्याचे देखील दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे या जिल्हाचे प्रशासकीय प्रमूख म्हणून आपणाकडे वारंवार तक्रार करुन देखील आपणाकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही हे दुर्दैवी आहे. सबब येत्या २० दिवसात अगर येत्या स्वातंत्र्य दिनाचे पूर्वी आपणाकडून सदर बेकायदेशीर व्यवहाराबाबत कारवाई करण्याबाबत पाऊल उचलले न गेल्यास येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्टला मी आपल्या कार्यालयाच्या गेटसमोर उपोषणास बसणार आहे यांची कृपया नोंद घेण्यात यावी, असे भुषण आंगचेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments