कणकवली, ता. २२: तालुक्यातील हळवल फाटा येथे गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. ओरोसहून मुंबईच्या दिशेने जात असलेली बीएमडब्ल्यू चारचाकी कार येथील तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या लेनमध्ये घुसून पलटी झाली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कारमध्ये एकूण तीन प्रवासी होते. अपघातानंतर तिघांनाही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. अपघातामुळे कारचा दर्शनी भाग आणि छताच्या भागाचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच ११२ आपत्कालीन सेवेला कळविण्यात आले. त्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनोज गुरव, कविता सावंत, किरण कदम तसेच महामार्ग वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन मार्गावरून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
या अपघातामुळे काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.