आचरा,ता.०९: आचरा-पिरावाडी येथे एका विवाहित महिलेने ओळखीचा फायदा घेत घरात राहण्यासाठी येऊन तब्बल २ लाख ४२ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आचरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिरावाडी येथे राहणाऱ्या समिधा गणपत चौगुले (वय ३३) यांनी काल आचरा पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या लोखंडी कपाटातून १ लाख ५० हजार रुपयांचे तीन पदरी मंगळसूत्र, ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र, आणि २ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या नथी असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
समिधा चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा करुनाघन जोशी (वय १९, रा. मालवण) ही तिच्या लहानपणापासून शेजारी राहत असल्यामुळे चौगुले कुटुंबाची तिच्याशी चांगली ओळख होती. तिचा घरी नेहमी येण्या-जाण्याचा वावर होता. गणेशोत्सवाच्या काळात ५ सप्टेंबरला ती चौगुले यांच्यासोबत त्यांच्या घरी राहण्यासाठी आली. घरी आल्यावर चौगुले यांनी आपले अंगावरील सोन्याचे दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेवून कपाटात ठेवले.
ऋतुजा जोशी ६ सप्टेंबरला तिचा पती घ्यायला आल्यानंतर निघून गेली. त्यानंतर घरात दुसरी कोणीही व्यक्ती आली नव्हती. ८ सप्टेंबरला समिधा चौगुले एका कार्यक्रमासाठी तयार होताना कपाटातील दागिन्यांचा डबा शोधत असताना त्यांना तो सापडला नाही. त्यामुळे त्यांना ऋतुजा जोशीवर संशय आला. त्यांनी तात्काळ आचरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. तक्रारीची गंभीर दखल घेत आचरा पोलिसांनी तपास सुरू केला आणि मंगळवारी संशयित ऋतुजा जोशीला ताब्यात घेतले. आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.