काही विद्यमानांचे पत्ते कट ; अनेक इच्छुक महिलांना संधी…
मालवण, ता. ८ : येथील पालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिला म्हणून जाहीर झाल्यानंतर आज पालिकेच्या दहा प्रभागातील २० जागांची आरक्षण सोडत पार पडली. यात काही विद्यमानांचा पत्ता कट झाला आहे. नवीन इच्छुकांना संधी मिळाली आहे तर काही विद्यमानांना अन्य प्रभागात जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे.
येथील पालिकेच्या १० प्रभागातील नगरसेवकांच्या २० जागांची आरक्षण सोडत आज प्रांत ऐश्वर्या काळूशे, प्रभारी मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, गणेश कुशे, महेंद्र म्हाडगुत, अन्वेशा आचरेकर, महिमा मयेकर, पूजा करलकर, पूजा येरलकर, पंकज सादये, बाबी जोगी, तपस्वी मयेकर, अंजना सामंत, नरेश हुले, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. टोपीवाला हायस्कूलच्या गौरी वस्त, देवयानी कुलकर्णी, अनिमिष पवार, अनुज चव्हाण या चार विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.
सुरवातीस प्रभाग चार मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या टक्केवारीनुसार जास्त असल्याने या प्रभागातील एक जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी आरक्षित करण्यात आली. गतवेळी या जागेवर महिला उमेदवार निवडून आल्याने यावेळी ही जागा पुरुष उमेदवारासाठी असेल असे प्रांत श्रीमती काळूशे यांनी स्पष्ट केले.
प्रभागनिहाय आरक्षण असे- प्रभाग १ अ : सर्वसाधारण, ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग २ अ : सर्वसाधारण, ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ अ : सर्वसाधारण, ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ अ : अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ अ : ओबीसी सर्वसाधारण, ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ अ : सर्वसाधारण, ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ अ : सर्वसाधारण, ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब : सर्वसाधारण, प्रभाग ९ अ : सर्वसाधारण, ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १० अ : सर्वसाधारण, ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
आज जाहीर झालेल्या आरक्षणात अनेक विद्यमानांचे पत्ते कट झाले. तर काही माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अनेक नवीन महिलांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे दिसून आले. माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या प्रभागात ओबीसी आरक्षण पडल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. आता त्यांना अन्य प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. यात काही नवीन इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यात नाराजी पसरल्याचे दिसून आले. प्रभाग दहा मध्ये सर्वाधिक उमेदवार असल्याने याठिकाणी उमेदवार देताना राजकीय पक्षांची कसोटी लागणार असल्याची चिन्हे आहेत.