कुडाळ,ता.०८: व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ आयोजित “ओरेशन २०२५ -२६” ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व निबंध स्पर्धा लॉ कॉलेजमध्ये उत्साहात संपन्न झाली. यंदा बारा वर्षे पूर्ण करणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील महाविद्यालये सहभागी झाली होती. निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या असल्या तरी वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. वक्तृत्व स्पर्धेच्या वरिष्ठ गटातून सायली खोत तर वरिष्ठ गटातून श्रावणी आरवंदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेसाठी परीक्षक, प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून कुडाळ येथील ऍड. सावनी तायशेटे, पाट हायस्कूलच्या शिक्षिका यज्ञा साळगावकर व कुडाळ येथील प्रसिद्ध निवेदक व पत्रकार निलेश जोशी यांनी काम पाहिले. स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. यानंतर व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. शिल्पा मर्गज यांनी सर्व मान्यवरांचा कॉलेजच्या वतीने सत्कार केला. स्पर्धेच्या प्रास्ताविकामध्ये व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचे प्रा.विवेक जोशी यांनी सर्व मान्यवरांचे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातून आलेल्या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांचे लॉ कॉलेज कुडाळच्या वतीने स्वागत करताना ओरेशन या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व निबंध स्पर्धेची सुरुवात २०१० सालापासून करण्यात आली आणि कोरोनाची वर्षं वगळता अविरतपणे व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळकडून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यावर्षी या स्पर्धेला बारा वर्षे पूर्ण होत असून या स्पर्धात्मक उपक्रमाचे आज एक तप पूर्ण झाले आहे. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला व लेखनकौशल्य अधिकाधिक विकसित होऊन उत्तम वक्ते,श्रोते व लेखक घडावेत याच एकमेव उद्देशाने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते असे सांगितले.
यानंतर कनिष्ठ महाविद्यालय विभागातील स्पर्धेला सुरुवात करण्यात आली व त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालय विभागातील स्पर्धा पार पडली. या स्पर्धांसाठी असलेले विषय हे या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य असते. दोन्ही गटांसाठी, 1) व्यथा कोकणाची!, 2) देश माझा मी देशाचा, 3)आजचं प्रेम -उदात्त की विकृत?, 4)बरे झाले देवा केलेस उपकार! घातले जन्मास बाईच्या या!?, 5) माणुसपण हरवलंय!, 6) तरुण भारतामध्ये वृद्धाश्रमांची वाढती संख्या – चिंता व चिंतन, 7)आजचे बालपण – काळ सुखाचा की….?, 8) खाद्य संस्कृती- गरज ते चंगळ!, 9)भारतीय संस्कृती विनाशाच्या उंबरठ्यावर? आणि 10)नेटच्या युगात शिक्षकांची गरजच काय ? असे विषय होते.
तर निबंध स्पर्धेसाठी 1) पाणी पेटते आहे !, 2) मरण स्वस्त,जगणे महाग!, 3) कोकण आणि शाश्वत विकास, 4)स्त्री सबलीकरण आणि पुरुषांचे हक्क, 5)तरुणाईची भाषा -प्रगती की अधोगती, 6)भारतीय समाजातील तृतीयपंथीयांचे स्थान, 7)आजचे चित्रपट -आजच्या समाजाचे प्रतिबिंब, 8)माणसाची हरवली अक्कल! आज जिकडेतिकडे गुगल!,9) मानसिक आरोग्यम् धनसंपदा, 10) दहशतवादाला धर्म असतो !? हे विषय देण्यात आलेले होते. या विषयांवर सर्व स्पर्धकांनी सात मिनिटांच्या कालावधीमध्ये आपले वक्तृत्व परीक्षकांसमोर सादर केले.
स्पर्धेनंतर व निकालाच्या आधी परीक्षक निलेश जोशी यांनी सर्व परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. श्री .जोशी यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळचे अभिनंदन करून कॉलेज कडून अखंडपणे सुरू असलेल्या या स्पर्धात्मक उपक्रमाचे कौतुक केले. प्रा. विवेक जोशी यांच्याकडून दरवर्षी या स्पर्धेसाठी काढले जाणारे विषय हे निश्चितच इतर स्पर्धांपेक्षा आगळे वेगळे व विचार करायला प्रवृत्त करणारे असल्याने परीक्षक म्हणून स्पर्धेचे परीक्षण करत असताना या सर्व विषयांसंदर्भात आजच्या तरुणाईचे विचार ऐकण्याची संधी मिळते. या विषयांमध्ये विविध सामाजिक, राजकीय,आर्थिक आणि कायदेविषयक कंगोरे असतात आणि या नावीन्यपूर्ण विषयांमुळेच आम्ही दरवर्षी या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी आम्ही उत्सुक असतॊ. गेली बारा वर्षे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेसाठी इतके सुंदर विषय सातत्याने दिल्यामुळे परीक्षक म्हणून काम करताना आम्हाला समाधान वाटते असे सांगून त्यांनी याबद्दल प्रा. विवेक जोशी यांचे विशेषत्वाने कौतुक केले.
यानंतर वक्तृत्व कलेविषयी सखोल व सविस्तर मार्गदर्शन करताना परीक्षक निलेश जोशी यांनी एक लघुकार्यशाळा घेतली त्यामध्ये त्यांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करताना देहबोली, हातवारे-हावभाव,सुष्पष्ट उच्चार,भाषेची शुद्धता व ओघवती भाषाशैली,विषयाचे आकलन, विषयातील मुद्दे, मुद्दे मांडणी, आत्मविश्वास व सभाधीटपणा, माइकचे प्रकार, माईक कसा वापरावा आणि वक्तृत्वकला अधिकाधिक विकसित करण्यासाठी काय करावे तसेच काय करू नये इत्यादी अनेक कंगोऱ्यांवर प्रात्यक्षिकांच्या मदतीने सहज सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला अधिकाधिक विकसित व्हावी या दृष्टिकोनातून व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळच्या सहकार्याने कॉलेजमध्ये वक्तृत्वकलेसंदर्भातील कार्यशाळेचे आयोजन करण्याविषयी आग्रह व्यक्त केला. भविष्यात अशी कार्यशाळा आयोजित करायचे ठरल्यास त्याला लॉ कॉलेज कुडाळचा निश्चितच पाठिंबा असेल याची लॉ कॉलेज कुडाळच्या वतीने सर्व परीक्षकांना खात्री देण्यात आली.
यानंतर मान्यवरांकडून वक्तृत्वस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक- श्रावणी आरवंदेकर, वेतोरा हायस्कूल, द्वितीय क्रमांक- रामदास मोर्ये,पाट हायस्कूल, तृतीय क्रमांक- समीक्षा मर्गज, पणदूर हायस्कूल, उत्तेजनार्थ प्रथम- साक्षी साळकर, पणदूर हायस्कूल
उत्तेजनार्थ द्वितीय- अनुष्का पवार. वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक- सायली खोत, पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेज कुडाळ, द्वितीय क्रमांक- सानिया धरणे, संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ, तृतीय क्रमांक- सुरभी त्रिंबककर, मॅनेजमेंट कॉलेज आचरा, उत्तेजनार्थ प्रथम- समृद्धी बिर्जे, एस. एच. केळकर कॉलेज, देवगड
उत्तेजनार्थ द्वितीय- सिद्धी जांभवडेकर, वराडकर कॉलेज यांनी मिळविला. व्हिक्टर डांटसलॉ कॉलेजच्या वतीने सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, रोखरक्कम आणि रत्नागिरी येथील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. पाटणे लिखित ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ हे पुस्तक देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनी चार्मी पटेल, प्रणिता परब,आफरीन शेख, निधी बागवे आणि प्रा. शांभवी तेंडोलकर यांनी केले. या स्पर्धेअंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल असे व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.