बांदा,ता.०८: मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “रंगोत्सव स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा” कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
“रंगोत्सव” या उपक्रमांतर्गत रंगभरण, हस्ताक्षर, फिंगर अँड थम्ब पेंटिंग, कोलाज, मास्क मेकिंग, टॅटू मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली कलागुणांची झलक सादर केली.
या स्पर्धेत चार विद्यार्थ्यांनी कांस्यपदक, पाच विद्यार्थ्यांनी रौप्यपदक तर दहा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत यशाचा टप्पा गाठला. इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी मिताली साळगावकर हिने कोलाज स्पर्धेत “आर्ट मेरिट अवॉर्ड” पटकावून शाळेचा गौरव वाढविला.
या बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईचे चेअरमन मंगेश कामत उपस्थित होते. त्यांच्यासह शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य भिकाजी धुरी, लक्ष्मण गवस, सुरेश गावडे आणि जितेंद्र नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी शाळेच्या कलाशिक्षिका हर्षदा तळवणेकर यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निती साळगावकर व सर्व शिक्षिकांना त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला शाळेच्या सहशिक्षिका वेलांकनी रोड्रिक्स, मयुरी कासार आणि स्वरा राठवड उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी उत्साहात पार पाडले. रंगोत्सव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि कलाविष्काराला नवी प्रेरणा मिळाली.