दोडामार्ग, ता.०९: वीजघर राज्यमार्गावरील आवाडे येथे एक आयशर मालवाहू गाडी नाल्यात घसरून अपघातग्रस्त झाली आहे. या घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अपघातानंतर घटनास्थळी चालक किंवा अन्य कोणतीही संबंधित व्यक्ती आढळून आलेली नाही. त्यामुळे चालक जखमी झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, हा अपघात मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास घडला असावा. अपघाताची माहिती मिळताच पोलिस पाटील देसाई यांनी तात्काळ आवाडे येथील घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. गाडी नाल्यात पूर्णपणे घसरल्यामुळे तिला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागणार आहे. चालक घटनास्थळी नसल्याने तो जखमी अवस्थेत उपचारासाठी गेला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गाडीच्या मालकाचा आणि चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसला तरी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू आहे.