संविधानिक हितकारणी महासंघाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर…
सिंधुदुर्गनगरी,ता.०९: अपघाता दरम्यान झालेल्या जनअक्रोश आंदोलना नंतर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना जाती वाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर “ॲट्रॉसिटी” अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी संविधानिक हितकारणी महासंघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. साळगाव येथे झालेल्या एका अपघातात कारची धडक बसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यावरून आंदोलन झाले होते. त्यानंतर श्री. नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्याला शिवीगाळ तसेच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी निवेदन दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, सार्वजनिक पदावर काम केलेल्या व्यक्तीकडून अशी जातीय वागणूक होणे धक्कादायक आहे. त्यामुळे कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित अधिकारी साळुंखे यांना न्याय मिळवून द्यावा. महासंघाने या निवेदनामध्ये काही राजकीय प्रतिनिधींकडून ॲट्रॉसिटी कायद्याच्या दुरुपयोगाचा मुद्दा पुढे करून मागासवर्गीय समाजाविरुद्ध नकारात्मक वातावरण तयार केले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारामुळे समाजात जातीय तणाव वाढू शकतो, म्हणून अशा हालचालींना आळा घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या घटनेचा निषेध करत महासंघाने ॲट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याची मागणी केली आहे. या मागणीप्रसंगी महेश परुळेकर, गौतम खुडकर, विनोद कदम, सुशील कदम आणि किरण जाधव हे महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.