Thursday, October 9, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासमाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावणारे संशोधन चिरकाल टिकते..

समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावणारे संशोधन चिरकाल टिकते..

प्रा. प्रकाश पवार; बांदा येथे किशोर म्हेत्री यांच्या ग्रंथाचे उत्साहात प्रकाशन…

 

बांदा,ता.०९: विविध क्षेत्रात होत असणारे संशोधन जर समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावत असेल, तर ते संशोधन चिरकाल टिकते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रकाश पवार यांनी आज येथे केले. डॉक्टर किशोर म्हेत्री यांच्या भंडारी समाजाचा राजकीय इतिहास या संशोधनात्मक ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. श्रीमती चंद्राबाई कलाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरीटेबल ट्रस्ट हलकर्णी व गोगटे-वाळके कॉलेज बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अभिजीत महाले यांनी केले. प्रा. पवार पुढे म्हणाले की, “एखाद्या समाजाची उन्नती त्याच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जाणीवेतून होत असते ,भंडारी समाजाला इतिहासकालीन संदर्भ आहेत. शिवकालखंडामध्ये योग्य असा सन्मान प्राप्त असलेला हा समाज आहे. दिलेल्या जबाबदारीशी बांधिलकी जोपासत शिवकालखंडातील भांडाराचा प्रमुख म्हणून कार्य करणाऱ्या या समाजाची आज सगळ्याच दृष्टिकोनातून प्रगती व विकास झालेला आढळतो. भंडारी समाजातून राजकीय नेतृत्व उदयाला येत आहे व हा समाज सक्षमपणे नेतृत्व आत्मसात करीत आहे. याच दृष्टीने झालेला हा संशोधनात्मक अभ्यास या समाजाला निश्चितच दिशादर्शक ठरेल”

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. काजरेकर म्हणाले की, “ज्ञानाची क्षेत्रे विकसित होत आहेत ,संशोधन क्षेत्र फक्त पदवी संपादन करण्यासाठी नाही तर या संशोधनातून निर्माण झालेले ज्ञान समाजात रुजले तरच हे संशोधन सत्कारणी लागेल या दृष्टीने प्रा. किशोर म्हेत्री यांचा हा मौलिक ग्रंथ समाजाला योगदान देणारा आहे ” यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुरेंद्र जोंधळे, शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे प्रभारी अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर , गुरुनाथ पेडणेकर, बांदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाळा आकेरकर , भंडारी समाजाचा राजकीय इतिहास या ग्रंथाचे लेखक प्रा. डॉ. किशोर म्हेत्री आदि उपस्थित होते. यावेळी प्रा डॉ म्हेत्री यांनी आपल्या ग्रंथाचा सर्वांगीण आढावा घेत अंतरंग उघडून दाखविले हा अभ्यास करताना आलेल्या अडचणी व संशोधनातील कार्य यावर सविस्तर मांडणी त्यांनी केली. यावेळी या ग्रंथ प्रकाशनाला प्रभारी अध्यक्ष प्रमोद कामत यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच गुरुनाथ पेडणेकर म्हणाले की, ” या समाजाचा केलेला अभ्यास समाजाला निश्चितच दिशादर्शक ठरेल व या ग्रंथाचा सारासार अभ्यास करून आपल्यातील कमतरता व विकासाच्या चांगल्या कल्पना हा समाज निश्चित आत्मसात करेल” अशी ग्वाही त्यांनी मनोगतात दिली. यावेळी श्रीमती कलाप्पा श्रीमती चंद्राबाई कल्लाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रा. डॉ.सुरेंद्र जोंधळे प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचा ट्रस्टच्यावतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक मुकुंद कांबळे व सुनील कांबळे , युवा उद्योजक बाबा टोपले, विनय गवस आदीजन उपस्थित होते. हा प्रकाशन सोहळा दिमाखदार पद्धतीने बहुसंख्य अभ्यासक , संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी केले तर आभार ट्रस्ट सचिव प्रा. डॉ. अनिल शिर्के यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments