औचित्य गंजिफाच्या पोस्ट तिकीटाचे; उपस्थितांनी दिल्या शुभेच्छा…
सावंतवाडी, ता.०९: येथील संस्थानाच्या गंजिफा कलेला भारतीय पोस्टाच्या तिकिटावर सन्मान मिळाल्यानंतर आज येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने राजघराण्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सावंतवाडी संस्थानाचा आणि गंजिफा कलेचा इतिहास देश आणि परदेशात सुद्धा पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले यांनी व्यक्त केला.
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातनंतर सावंतवाडीचे राजघराणे आज सावंतवाडीत आले. यावेळी त्यांचा पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला. यावेळी राणीसाहेब शुभदादेवी युवराज लखमराजे भोंसले ,युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे डॉ.सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, प्रा. जी.एम शिरोडकर, प्राचार्य डॉ. डी एल भारमल तसेच एसपीके महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मोहन कुलकर्णी, सदाशिव धुरी, पांडुरंग धुरी, रामचंद्र ठाकूर, वर्षा लोंढे, विश्वनाथ कुलकर्णी, लाडू ठाकूर, गायत्री कुलकर्णी, सुकन्या पवार, गौरी पारकर, आर्या देवरूखकर, सोनाली कुंभार, यश धुरी, भुवन हळसकर, निकिता आराबेकर, सचिन कुलकर्णी या कलावंतांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोंसले म्हणाल्या, राजेसाहेब शिवरामराजे भोंसले, राजमाता सत्वशीलादेवी भोंसले यांच्यामुळे आज हा गंजिफा पोस्ट कार्डच्या माध्यमातून सावंतवाडीची कला देशोदेशी पोहोचणार आहे. ही सावंतवाडीसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी केले. तसेच गंजिफा कलावंतांना सरकारने राजाश्रय द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली. तसेच युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, या पोस्टकार्डवर दशावतार गंजिफा कलेचे सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे. कृष्णाचे दहा अवतार यातून बघायला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती, परंपरा देखील समजणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या समृद्ध लोककलांना एक मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सावंतवाडीच्या कला-संस्कृतीचा, परंपरेचा आणि माझ्यासारख्या कलाकारांच्या मेहनतीचा हा गौरव आहे. हा मोठा सन्मान असून आज खूप आनंद झाल्याची भावना ज्येष्ठ गंजिफा कलावंत मोहन कुलकर्णी यांनी व्यक्त केली.