देवगड,ता.०९: बेकायदा गुटख्याची साठवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जामसंडे येथे एकावर गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत रामचंद्र लाड ( वय २५) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३७ हजार ८४४ रूपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल सायंकाळी ५.२५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, एलसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जामसंडे बाजारपेठेत अनिकेत लाड यांच्या दुकानावर धाड टाकली असता विमल पानमसाला, रॉयल दुबई गुटखा, व्हीवन टोबॅको, आरएम्डी पानमसाला, एम् सेटेंड टोबॅको गोल्ड अशा गुटख्याचे २२५ पॅकेट त्याच्याकडे आढळून आलीत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरिक्षक सुधीर सावंत, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, किरण देसाई, ज्ञानेश्वर तवटे, महिला पोलिस अंमलदार स्वाती सावंत या टीमने केली. देवगड पोलिस स्थानकात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार गुरूनाथ तवटे यांनी फिर्याद दिली असून देवगड पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपाय सुरू आहे.