ठाकरे सेनेची सत्ताधार्यांकडे मागणी; दोडामार्ग तहसिलदारांना निवेदन…
दोडामार्ग, ता.०९: अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांचा सातबारा कोरा करा, त्यांना आवश्यक ती मदत द्या, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन दोडामार्ग तहसिलदारांना देण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे त्यांना किमान हेक्टरी पन्नास हजाराची तरी मदत करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, महाराष्ट्रात सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण व पश्चिम महाराष्ट्र याठिकाणील शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. योग्य वेळ आली की कृषी कर्ज माफ करू, असे सरकार मधील मंत्री सांगत होते. अतिवृष्टीमुळे शेतीची नासधूस झाली असून शेतकरी संकटात आले आहेत. त्यामुळे हीच योग्य वेळ असून ही कर्ज माफी झाली पाहिजे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पीक विम्याचे कठीण निकष बाजूला ठेऊन पंचनामे न करता सरसकट पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशा विविध मागण्यांचे निवेदन ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिले.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, सोशल मीडिया तालुकाप्रमुख संदेश राणे, उप तालुकाप्रमुख मिलिंद नाईक, संदेश वरक यांसह पदाधिकारी उपस्थित होते.