Friday, October 10, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याज्येष्ठ खेळाडूंच्या 'सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग'चे नाव आता 'सिंधुदुर्ग हौशी प्रीमिअर लीग'...

ज्येष्ठ खेळाडूंच्या ‘सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग’चे नाव आता ‘सिंधुदुर्ग हौशी प्रीमिअर लीग’…

मालवण, ता. ९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे नाव यापुढे ‘सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग’ ऐवजी ‘सिंधुदुर्ग हौशी प्रीमिअर लीग’ असे ठेवण्याच्या सूचनेला जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सभेत सर्व सदस्यांनी एकमताने संमती दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा धुरीवाडा येथील संस्कार सभागृह येथे उत्साहात पार पडली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदीवे, सरचिटणीस काका कुडाळकर व बबन हळदीवे, खजिनदार बबन परब यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सदस्य उपस्थित होते.

‘सिंधुदुर्ग हौशी प्रीमिअर लीग’ यावर्षी कणकवली असोसिएशनच्या आयोजनाखाली कणकवली येथे होणार आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटूंना स्पर्धा क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी या मूळ संकल्पनेसोबतच मागील वर्षापासून असोसिएशनने मुलांच्या विविध वयोगटांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी सर्व तालुका असोसिएशनचे सहकार्य मिळत आहे.

वयोगट १४, १६, १९ वर्षांखालील मुलांसाठी ५ दिवसांचे लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण शिबीर मालवण येथील बोर्डीग ग्राऊंड येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.

१६ वर्षांखालील मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ला मैदान येथे करण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील तालुका संघ टेनिस क्रिकेट स्पर्धा दरवर्षीप्रमाणे सावंतवाडी येथे होणार आहे. ४५ वर्षांवरील तालुका संघ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात येत आहे.

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांना कोकण साहित्य परिषदेचा ‘कविता राजधानी २०२५’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल असोसिएशनच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. अध्यक्ष अनिल हळदीवे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. पिंटो यांचा गौरव केला.

अध्यक्ष अनिल हळदीवे यांनी संघटनेला ५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. “राजकीय आणि व्यावसायिक हाडवैरी कधीही एकत्र येत नाहीत, असा अनुभव असतानाही आपल्या संघटनेत सर्व क्षेत्रांतील मंडळी सहभागी झाले आहेत. पाहिलेले स्वप्न यशस्वी झाले आहे,” असे ते म्हणाले.

ज्येष्ठ क्रिकेटपटू महेश कांदळगावकर यांनी, “ज्येष्ठ खेळाडूंनी विरंगुळा म्हणून निर्माण केलेली संघटना आता मुलांसाठी लेदर क्रिकेट स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. यापुढे क्रिकेट व्यतिरिक्त काही सामाजिक उपक्रमसुद्धा सुरू करून किमान एक-दोन उच्च दर्जाचे क्रिकेटपटू घडवण्याचा प्रयत्न करूया,” असे मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments