गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान; वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
वेंगुर्ले,ता.०९: मद्यधुंद अवस्थेत अपघात करणाऱ्या युवकाने त्या ठिकाणी बचावासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार मठ येथे घडला. साईप्रसाद उर्फ गोठ्या विजय नाईक (वय ३२, रा. आडेली) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल रात्री घडली. या प्रकरणी संबंधित युवकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलिस हवालदार स्वप्निल तांबे याने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आडेली येथील साईप्रसाद उर्फ गोठ्या विजय नाईक (वय ३२) याने आपल्या ताब्यातील एर्टिगा दारूच्या नशेत भरधाव वेगात चालवून वेंगुर्ला-सावंतवाडी मार्गावरील मठ हायस्कूलच्या गेटच्या भिंतीला आदळून अपघात केला. या अपघातात गाडीचे आणि हायस्कूलच्या गेटचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र तो बचावला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना नाईक याने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलिस हवालदार तांबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,
अपघात केल्याप्रकरणी तसेच पोलिसांना शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करत आहेत.