केसरकर करणार तेलींचे स्वागत; शिवसेना प्रवेशानंतर प्रथमच जिल्ह्यात…
सावंतवाडी /अमोल टेंबकर, ता.०९: विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहून दंड थोपटणारे आमदार दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली उद्या एकत्र येणार आहेत. विषेश म्हणजे श्री. तेली हे केसरकरांच्या निवासस्थानी आपली हजेरी लावणार असून त्याच ठिकाणी त्यांचे जल्लोषी स्वागत होणार आहे. ठाकरे शिवसेनेत असलेल्या श्री. तेली यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते प्रथमच उद्या सकाळी सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केसरकरांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे स्वागत होणार आहे. श्री. केसरकर आणि तेली यांचे विळी भोपळ्याचे नाते आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघांनीही सोडली नव्हती. तर तेली यांनी भाजपात असताना श्री. केसरकर यांच्यावर नेहमी टीका केली होती. त्यामुळे त्यांचे वैरत्व मतदार संघालाच नव्हे तर जिल्ह्याला माहिती होते. मात्र राजकारणात कोण कोणाचा कायम मित्र आणि कोण कोणाचा कायम शत्रुूही राहत नाही, हे आता सिध्द होणार आहे. कारण शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर श्री. तेली हे केसरकरांच्या निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समवेत खुद्द आमदार तथा शिवसेनेचे युवा नेते निलेश राणे देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आता या दोघातील वैरत्व संपून पक्ष संघटनेसाठी ते एत्रक येतील, हे निश्चित आहे. परंतु तेली यांनी मागच्यावेळी केलेल्या टीकेत सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा विकास रखडला, रोजगार, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, असे वारंवार बोलून दाखविले होते. त्यामुळे आता हे दोघे एकत्र आल्यानंतर निश्चितच मतदार संघातील प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत आहे.