कुडाळ,ता.०९: तालुक्यात झाराप तिठा येथील एका मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी इअरबड्स, अन्य साहित्य आणि रोख ५ हजार रुपये मिळून १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना काल रात्री घडली.या प्रकरणी शॉपी मालक वैभव गुरुनाथ कांडे (२७, रा. वजराट कांदेवाडी) यांनी कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून
याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार अनिल पाटील करत आहेत.
दरम्यान, कुडाळ शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून छोट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दुकानाबाहेर ठेवलेल्या वस्तू, घराच्या परिसरातील साहित्य आणि बाजारपेठेतील बॅनरचीही चोरी होत आहे. मात्र, यापैकी अनेक घटनांची तक्रार संबंधित लोक पोलिसांत करत नाहीत. तक्रार केली जात नसल्यामुळे या भुरट्या चोरांचे मनोबल वाढत चालले आहे, अशी चिंता व्यक्त होत आहे.