सावंतवाडी, ता.१०: वृद्धापकाळात निराधार झालेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने कुडाळ येथील जिव्हाळा सेवाश्रमात आश्रय मिळाला आहे. भालचंद्र शिरोडकर (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अपत्य नसल्याने ते पत्नीच्या निधनानंतर पूर्णपणे निराधार झाले होते. माजगाव येथील एका पाईप कंपनीत काम करत असताना त्यांची माजगाव येथील दुकानदार सुरेश मांजरेकर यांच्याशी मैत्री होती. मांजरेकर यांच्या निधनानंतर त्यांना तोही आधार हरपला.
दोन वर्षांपूर्वी वृद्धपणामुळे त्यांचे काम सुटले आणि ते भटकू लागले. या परिस्थितीत खूप हाल झाल्यानंतर त्यांनी मित्र मांजरेकर यांच्या घरी येऊन त्यांच्या मुलीकडे काही दिवस थांबण्याची किंवा आश्रमात भरती करण्याची विनंती केली. वडिलांचे मित्र म्हणून मांजरेकर यांच्या मुलीने त्यांना एक महिना घरात आश्रय दिला आणि आश्रमात प्रवेश मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू केले. याचदरम्यान सामाजिक कार्यकर्ते उमा वारंग यांच्यामार्फत रवी जाधव यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परिस्थितीची माहिती मिळाल्यावर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, हेलन निबरे, रूपा मुद्राळे आणि लक्ष्मण कदम यांनी तातडीने भालचंद्र शिरोडकर यांच्या भेटीसाठी धाव घेतली.
जवळचे खूप आहेत पण म्हातारपणी साथ देणारा कोणी नाही. मी फार दमलो आहे, आता हातपाय काम करत नाहीत, मला कुठच्यातरी आश्रमात टाका, असे मन हेलावणारे शब्द भालचंद्र शिरोडकर यांनी यावेळी बोलून दाखवले. त्यांच्याजवळ साधे कपडेही नसल्याने प्रतिष्ठानने त्यांना नवीन कपडे घेऊन दिले. तसेच हात-पाय दुखी आणि आजारपणावर रूपा गौंडर यांनी त्यांच्यावर डॉक्टरी उपचार करून औषध गोळ्यांची व्यवस्था केली. अखेर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या साहाय्याने शिरोडकर यांना कुडाळ पिंगुळी-माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात भरती करण्यात आले.