राजन तेलींचा दावा; अडचण-इगो नाही, प्रामाणिकपणे संघटनेसाठी काम करणार…
सावंतवाडी,ता.१०: दीपक केसरकर आणि मी एकत्र आलो तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महायुती म्हणून किंवा स्वबळावर शंभर टक्के जिंकू. त्यांच्या सोबत काम करायला मला नक्कीच आवडेल, असा विश्वास माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान मी ज्या पक्षात काम करतो ते प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे आता रुसवे-फुगवे बाजूला ठेवून प्रामाणिकपणे काम करेन, पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा शब्द त्यांनी दिला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर श्री. तेली यांनी आज आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत ते जिल्ह्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तेेलींचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख निता कविटकर, अनारोजीन लोबो, राजेंद्र निंबाळकर, अशोक दळवी, नारायण राणे, दिनेश गावडे, बाबु कुडतरकर, प्रेमानंद देसाई, परिक्षीत मांजरेकर, झेवियर फर्नांडिस, क्लेटस फर्नांडिस, प्रशांत साटेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होतेे.
यावेळी श्री. तेली म्हणाले, पुन्हा एकदा मी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वगृही परतलो आहे. त्यामुळे येणार्या काळात सर्वांना सोबत घेवून काम करायचे आहे. येणार्या निवडणुका लक्षात घेता येथील जागा स्वबळावर किंवा महायुती म्हणून लढण्याची आमची तयारी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. मी आल्यानंतर अनेक जण शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. लवकरच हे प्रवेश होणार आहेत. त्यामुळे त्यांचा परिपाक येणार्या निवडणुकीत नक्कीच दिसेल. मी आणि दीपक केसरकर एकत्र आल्यानंतर त्याचा पायदा येणार्या निवडणुकात दिसणार आहे. येथील शंभर टक्के जागा या शिवसेनेच्या ताब्यात येतील, यात काही शंका नाही.