नितेश राणे; देवा भाऊंच्या सरकारच्या काळात सर्व अडथळे दूर…
कणकवली, ता.१०: चीपी विमानतळातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे डिसेंबरपासून या विमानतळावरून होणारी डे-नाईट विमानसेवा सुरळीत सुरू होईल, असा दावा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला. दरम्यान जिल्हा नियोजनच्या माध्यमातून रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व अडथळे देवा भाऊंच्या सरकारच्या काळात दूर करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. चिपी विमानतळा संदर्भात आज श्री. राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी श्री. राणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग विमानतळावरील नाईट लँडिंगची परवानगी वर्षानुवर्षे रखडली होती, ती आता दूर झाली आहे. यामुळे आता मोठ्या विमान कंपन्या जसे की, इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडिया यांच्यासाठी सिंधुदुर्ग विमानतळावर सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी १५ ते २० दिवसांमध्ये व्हीजीएफ प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यापासून सिंधुदुर्ग विमानतळावर डे- नाईट विमान सेवा सुरू होईल.
विमानतळाच्या सुविधा वाढवण्यासाठी आवश्यक असलेले नियोजनही सुरू झाले आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून विमानतळाच्या परिसराचे सुशोभीकरण आणि रस्तारुंदीकरण केले जाणार आहे. विमानतळाच्या परिसरातील लाइटिंगच्या कामांसाठी एमएससीबीकडे अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे कोकणच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.