वैभववाडी,ता.१०: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत करुळ ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आधार कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या हस्ते झाले.
यामध्ये पाच वर्षांखालील मुलांचे नवीन आधार कार्ड काढण्यात आले. त्याचबरोबर आधारकार्डमधील पत्ता, नाव, आडनाव आणि वय बदलणे यासारखे महत्त्वपूर्ण बदल देखील करण्यात आले. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी श्री. जंगले म्हणाले की, आज प्रत्येक व्यक्तीला आधार कार्डची आवश्यकता आहे, त्यामुळे ते आपल्याजवळ असणे खूप महत्त्वाचे आहे. केवळ आधार कार्डच नव्हे तर प्रत्येक ग्रामस्थांनी फार्मर आयडी आणि आयुष्यमान कार्ड देखील काढून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी करुळच्या सरपंच नरेंद्र कोलते, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब कोलते, कक्ष अधिकारी संतोष टक्के, पोस्ट विभागाचे अधिकारी तिर्लोटकर, मुख्याध्यापक दीपक घाटगे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर सावंत, विलास गुरव, महेश कदम, संजय कदम, प्रकाश सावंत तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव यांनी मानले.