राज्यभरातील ३५० अभ्यासकांचा सहभाग; सिंधुदुर्गचा ऐतिहासिक वारसा होणार उजाळा…
कणकवली, ता. १० : अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन प्रथमच कणकवली महाविद्यालयात१६ आणि १७ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रासह देशभरातील आणि दुबईसारख्या परदेशातूनही सुमारे ३५० अभ्यासक आणि प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती परिषद अध्यक्षा डॉ. अरुणा मोरे यांनी दिली.
कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मोरे बोलत होत्या. यावेळी परिषद सचिव प्राचार्य डॉ. सोपानराव जावळे, कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. नारायण गवळी, डॉ. शोभा वाईकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू, प्राचार्य युवराज महालिंगे, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. डॉ. शामराव डिसले, प्रा. डॉ. बी. एल. राठोड, प्रा. अमरेश सातोसे तसेच कार्यालयीन अधीक्षक संजय ठाकूर उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाल्या, “या अधिवेशनातून इतिहासाच्या नवसंशोधकांना व्यासपीठ मिळणार आहे. राज्यातील प्राचीन वारसा, कातळशिल्पे आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन या अधिवेशनाच्या माध्यमातून अधोरेखित होईल.” त्यांनी कणकवली शिक्षण मंडळ आणि महाविद्यालय प्रशासनाचे सहकार्याबद्दल आभार मानले.
डॉ. सोपानराव जावळे यांनी सांगितले की, अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या तीन सत्रांत शोधनिबंध सादर केले जातील. तसेच परिषदेकडून दिले जाणारे वार्षिक पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येतील. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रसिद्ध अभ्यासक डॉ. अशोक राणा (यवतमाळ), इतिहास संशोधक डॉ. जी.डी. खानदेशे यांचा प्रसिद्ध इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
विजयकुमार वळंजू म्हणाले, “सिंधुदुर्ग हा निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध जिल्हा आहे. या अधिवेशनामुळे जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनस्थळे राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होणार आहेत. अभ्यासकांना भौगोलिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक संशोधनाचा नवा अनुभव मिळेल.”
प्राचार्य युवराज महालिंगे यांनी सांगितले की, “शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशनाच्या सर्व तयारीला प्रारंभ झाला आहे. सामाजिक विज्ञान मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.”
इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी सांगितले की, “अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी १४ समित्या कार्यरत आहेत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले शोधनिबंध ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवावेत.”