आरोग्य सचिवांकडून धावती भेट; उत्तरे न मिळाल्याने लोकप्रतिनिधी नाराज…
सावंतवाडी, ता.१०: शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी आज येथील उपजिल्हा रुग्णालयाला धावती भेट देऊन तेथील गंभीर परिस्थितीचा आढावा घेतला. नियोजित दौरा उद्याचा होता मात्र ते एक दिवस आधीच दाखल झाले. या पाहणी दौऱ्यात त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना कोणतीही ठोस आश्वासने न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती अतिशय गंभीर असून मंजूर आकृतीबंधाच्या तुलनेत निम्माच स्टाफ येथे कार्यरत आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने विशेषत: हार्ट फिजिशीयन आणि ट्रॉमा केअर युनिटमधील पदे रिक्त असल्याने रुग्णांना उपचारांसाठी अनेकदा शेजारच्या गोवा-बांबोळी येथे जावे लागते. गेल्या चार दशकांपासून या समस्यांवर विविध आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने होऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
अभिनव फाउंडेशनने याबाबत दहा वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली आहे. ज्याचा खटला सध्या कोल्हापूर खंडपीठात सुरू आहे. न्यायालयाने या प्रकरणी ताशेरे ओढल्यानंतर राज्याचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. उपमहासंचालकांच्या भेटीनंतर आज खुद्द आरोग्य विभागाचे सचिव श्री. सिंह यांनी रुग्णालयाला भेट दिली. श्री. सिंह यांनी येथील प्रसूती गृह, मोड्युलर आय.सी.यू, ऑपरेशन थिएटर, टेलिमेडीसीन विभाग, रक्तपेढी, ट्रॉमा केअर युनिट आणि डायलेसीस सेंटरसह सर्व विभागांची पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दौरा अचानक आज झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. संजू शिरोडकर आणि रवी जाधव यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांचा पाढा श्री. सिंह यांच्यासमोर मांडला. सामाजिक कार्यकर्ते श्री. जाधव यांनी तर उपचारांविना जाणारे जीव आम्ही डोळ्यांदेखत पाहिले आहेत, अशा शब्दांत आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी ॲड. नंदन वेंगुर्लेकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी, समीरा खलील, रूपा मुद्राळे आणि अभिनव फाउंडेशनचे अण्णा म्हापसेकर, किशोर चिटणीस, राजू केळूसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अभिनव फाउंडेशनचे सचिव अण्णा म्हापसेकर यांनी सांगितले की, श्री. सिंह जिल्हाधिकारी असतानाच आम्ही जनहित याचिका दाखल केली होती आणि त्यावेळी त्यांनी उपोषण न करण्याचं आश्वासनही दिलं होतं. आज योगायोगाने तेच आरोग्य सचिव आहेत आणि त्यांना येथील आरोग्य समस्यांची माहिती आहे. मात्र, त्यांना निवेदन देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ॲड. पार्सेकर यांनी, ते इथे जिल्हाधिकारी असल्याने त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. ते सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे, असे मत व्यक्त केले. फार काळानंतर आरोग्य विभागाने या समस्येकडे गंभीरतेने लक्ष दिले आहे आणि खुद्द आरोग्य सचिवांचे पाय आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणेच्या समस्या सुटून जिल्हावासियांची ‘बांबुळी वारी’ थांबेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले श्री. सिंह या समस्येवर सकारात्मक कार्यवाही करतील, अशी अपेक्षा सिंधुदुर्गवासीय व्यक्त करत आहेत. रुग्णालयाचा आढावा घेतल्यानंतर श्री. सिंह यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही आणि माध्यमांशी बोलणे पूर्णपणे टाळले.