दोडामार्ग पोलिसांची कारवाई; आठ लाखाचा मुद्देमाल जप्त….
दोडामार्ग, ता.१०: बॉयलर कोंबडी वाहतूक करण्यात येणाऱ्या गाडीच्या आडून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गाडीसह ८ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बिरू लखू लांबर व बाबू धाकलू लांबर असे त्या दोघांचे नाव आहे. ही कारवाई आज सकाळी विजघर येथे करण्यात आली. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घाटमाथ्यावरून दररोज सायंकाळ आणि रात्रीच्या सुमारास ब्रॉयलर कोंबड्या घेऊन अनेक गाड्या तिलारी घाटमार्गे गोव्याला जातात आणि दुसऱ्या दिवशी पहाटे किंवा सकाळी माघारी येतात. अशीच एक कोंबड्या घेऊन गोव्याहून परतणारी गाडी शुक्रवारी सकाळच्या सुमारास विजघर येथील तपासणी नाक्यावर पोलिसांनी थांबवली. गाडीची तपासणी केली असता पोलिसांना गाडीच्या केबिनमध्ये गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ती गाडी दोडामार्ग पोलीस ठाण्यात आणली. यामध्ये ८ लाख रुपये किमतीची गाडी आणि ८ हजार १०० रुपये किमतीची दारू असा एकूण ८ लाख ८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय जाधव आणि श्री. साटेलकर यांनी ही कारवाई यशस्वी केली.