दुचाकी वरून सुरू होती वाहतूक; दोडामार्ग पोलिसांची पहाटे कारवाई…
दोडामार्ग, ता.१०: चक्क दुचाकीवरून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी आज पहाटे विजापूर येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अभिषेक काशिनाथ राठोड व विकास चंदू चव्हाण (दोघे रा. कुडगी तांडा, बागेवाडी-विजापूर) असे त्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर दोडामार्ग पोलीस ठाण्यात दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन्ही संशयित आज पहाटेच्या सुमारास हिरो स्प्लेंडर दुचाकीने गोव्यातून दोडामार्गच्या दिशेने येत होते. दरम्यान महाराष्ट्र- गोवा राज्याच्या दोडामार्ग सीमेवर तैनात असणाऱ्या पोलिसांनी त्यांची दुचाकी तपासणीसाठी थांबवली. यावेळी त्यांच्याकडे गोवा बनावटीचे अवैध मद्य आढळून आले. यात ओल्ड मंक असे इंग्रजी लेबल असलेल्या ७५० मिली मापाच्या, ३०० रु. किमतीच्या ४ बाटल्या, बुलेट ७७ असे इंग्रजी लेबल असलेल्या ७५० मिली मापाच्या, ३०० रु किंमतीच्या ६ बाटल्या, मॅजिक मोमेंट्स असे इंग्रजी लेबल असलेलेल ७५० मिली मापाच्या, १६०० रु. किंमतीच्या २ बाटल्या; हनी बी असे इंग्रजी लेबल असलेली ७५० मिली मापाची ४४० रु. किंमतीची १ बाटली राॅयल स्टॅग असे इंग्रजी लेबल असलेली २००० मिली मापाची, १८४० रु. किंमतीची १ बाटली, हनी बी असे इंग्रजी लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या १०० रु. किंमतीच्या ४ बाटल्या असे एकूण ८ हजार ८८० रुपयांचे गोवा बनावटीचे अवैध मद्य मिळून आले. तसेच ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली.