निलेश राणे; राजन तेलींच्या आगमनाने सेनेला नवी उभारी…
कणकवली, ता. १०: मतदारसंघात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी आज येथे केले. तसेच माजी आमदार राजन तेली हे शिवसेनेत आल्याने आता पक्षाला नवी उभारी मिळेल असेही ते म्हणाले. तर जिल्ह्यात “ओरिजनल शिवसेना”चे नेटवर्क मजबूत करण्यासाठी अहोरात्र कार्य सुरू आहे, असे माजी आमदार राजन तेली म्हणाले.
कणकवली येथील शिवसेनेच्या कार्यालयात आमदार निलेश राणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन वाढीसाठी झोकून देण्याचे आवाहन केले. कणकवली मतदारसंघात मित्रपक्षाचे प्राबल्य असले तरी महायुतीतील प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याची मुभा आहे. त्यामुळे पदाधिकारी व शिवसैनिकांनी कोणालाही न घाबरता गावोगाव शाखा स्थापन करून पक्षाची ताकद दाखवून द्या असेही आवाहन श्री.राणे यांनी केले.
ते पुढे म्हणाले, कणकवली मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या रूपाने हक्काचा माणूस दिला आहे. पक्षवाढीचे काम करताना दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संघर्ष टाळा पण कोणी अंगावर आले तर त्यांना शिंगावर घ्या. त्यांनी ऐतिहासिक उदाहरण देत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांकडे मुठभर सैन्य होते. त्या सैन्याने स्वराज्य स्थापन केले. तसेच खा. नारायण राणे यांनी १९९० मध्ये केवळ २८ दिवसांत झपाटून काम करून विजय मिळवला. त्याच ऊर्जेने आपणही काम केले पाहिजे.
आमदार राणे यांनी पुढे म्हणाले, शिवसेना हा महायुतीतील घटक पक्ष असल्याने कणकवली मतदारसंघातील जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी निर्धास्तपणे माझ्याकडे यावे. जनतेच्या प्रश्नांवर मी सदैव तत्पर आहे.
राजन तेली म्हणाले, शिवसेना हा माझा मूळ पक्ष आहे. काही कारणास्तव मी बाहेर पडलो होतो; परंतु आता पुन्हा स्वगृही परतलो आहे. दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षात येताना कोणतेही पद मागितले नाही; फक्त संघटनवाढीचे काम करण्याचा निर्धार केला आहे.
तेली पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन वाढविण्यासाठी मी झपाटून काम करणार आहे. कणकवली मतदारसंघात पक्ष वाढीसाठी पदाधिकारी व शिवसैनिकांना जेव्हा जेव्हा सहकार्याची गरज भासेल, तेव्हा मी उपलब्ध राहीन. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करून ताकद दाखवून द्या.
या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, समन्वयक संदेश सावंत-पटेल, माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, तालुकाप्रमुख दामू सावंत, सरपंच संजना आग्रे, प्रिया टेंबकर, भास्कर राणे, शेखर राणे आदी मान्यवर उपस्थित होते.