केवळ गटारांवर केलेली अतिक्रमणे हटविली; मोठ्या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…
कुडाळ,ता.१०: येथील नगरपंचायतीने आज शहरात सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम अपेक्षेनुसार पूर्ण होऊ शकली नाही. या अर्धवट कारवाईमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईपूर्वी सर्व स्टॉलधारकांना नोटीस पाठवण्यात आली होती. असे असूनही, बाजारातील अनेक स्टॉल्स जैसे थे असल्याचे दिसून आले. नगरपंचायतीचे कर्मचारी प्रत्यक्ष कारवाईसाठी सायंकाळी ४:३० च्या सुमारास बाहेर पडले. उशिरा सुरुवात झाल्याने एका दिवसात संपूर्ण बाजारपेठेतील अतिक्रमणे पूर्णपणे हटवणे नगरपंचायतीला शक्य झाले नाही आणि मोहीम अर्धवट राहिली.
या मोहिमेत नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी केवळ गटारांवर केलेली अतिक्रमणे हटविण्यावर लक्ष केंद्रित केले. मात्र, मुख्य आणि मोठ्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
बाजारपेठेत अनेक दुकानदारांनी त्यांच्या दुकानाचा अर्धा भाग मूळ जागेपेक्षा बाहेर थाटलेला आहे. अशा गंभीर अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे, ही मोहीम केवळ ‘दाखवण्यापुरती’ होती का? असा संतप्त सवाल सामान्य नागरिक आणि काही व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे.
कुडाळमधील नागरिकांनी मोठ्या अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई करून शहरातील रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी नगरपंचायतीकडे केली आहे.