सिंधुदुर्ग,ता.११: जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने “वसुंधरा पायी दिंडी” १० ऑक्टोबरला गोवा उपपीठावरून सुरू झाली आहे. ही दिंडी मजल-दरमजल करत १२ ऑक्टोबरला सायं. ५ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आगमन करणार आहे.
या दिंडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून जागोजागी वृक्षारोपण करून संपूर्ण विश्वाला “वसुंधरा बचाव” हा संदेश देण्याचे कार्य धामयात्री करत आहेत. १३ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता दिंडी बांदा येथील संत सोहीरोबानाथ मंदिरातून पुढे मार्गस्थ होईल. या दिवशी दिंडी सावंतवाडी मार्गे पाटीदार हॉल येथून पुढे झाराप येथील सावित्रीबाई मंगल कार्यालय येथे मुक्कामी थांबणार आहे. मजल दरमजल करत ही पायी दिंडी २० ऑक्टोबरला नाणीजधाम येथे पोचणार आहे.
या दिंडीच्या माध्यमातून गुरुंच्या पादुकांच्या दर्शनाचा व वसुंधरा बचावाच्या या पवित्र कार्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सर्व भक्तांनी आणि नागरिकांनी या दिंडीत सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.