आंबोली, ता.११: येथील गावठणवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी गेळे- कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी रात्री ९.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रात्री कामावरून घरी परतलेल्या कदम यांच्या भावाने खिडकीतून पाहिले असता त्यांना आनंद कदम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. दरवाजाला आतून कडी लावलेली होती. यानंतर त्यांनी तातडीने आंबोली पोलीस स्थानकात या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गलोले आणि हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कदम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. डॉ. जी.बी. सारंग आणि डॉ. महेश जाधव यांनी शवविच्छेदन केले.
पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. ज्यात कदम यांनी “मी टीईटी परीक्षा पास होऊ शकत नाही”, असा उल्लेख करून आत्महत्येचे कारण नमूद केले आहे..दरम्यान घटनेच्यावेळी आनंद कदम यांचे आई-वडील पुणे येथे होते तर त्यांची पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा गडहिंग्लज येथे राहत होते. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. कदम सर हे मनमिळाऊ स्वभावाचे आणि शिक्षणप्रेमी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे आणि शिक्षण सेवावृत्तीमुळे त्यांची परिसरात चांगली प्रतिमा होती. त्यांच्या निधनाने आंबोली आणि गेळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिक्षक वर्ग, राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनेश गावडे, संतोष पालेकर, सरपंच सागर ढोकरे, दिलीप सावंत, तातोबा गवस, बबन गावडे, गावठन वाडी मधील सर्व ग्रामस्थ, आंबोली मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सर्व राजकीय समाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.