झरेबांबर, कोनाळ, माटणे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित…
दोडामार्ग, ता.१३: येथील पंचायत समितीच्या मतदार संघाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार झरेबांबर, कोनाळ आणि माटणे हे तीनही मतदारसंघ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. तर साटेली-भेडशी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि कोलझर व मणेरी हे गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.
येथील तहसील कार्यालयात आज सकाळी परिविक्षाधीन प्रांताधिकारी लक्ष्मण कसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. शालेय विद्यार्थिनी स्पृहा सुमित दळवी हिच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नवीन आरक्षणामुळे अनेक माजी सदस्यांचा पत्ता कट झाला आहे
साटेली-भेडशी मागील वेळी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या या गणातून शिवसेनेच्या सुनंदा धर्णे उपसभापतीपदी निवडून आल्या होत्या. यंदा येथे ओबीसी सर्वसाधारण आरक्षण लागू झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. कोलझर मध्ये मागील वेळी ना.मा.प्र.साठी आरक्षित असलेल्या या गणातून शिवसेनेचे गणपत नाईक निवडून आले होते. यंदा हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.
मणेरी मध्ये मागील वेळी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या या गणातून शिवसेनेच्या धनश्री गवस निवडून आल्या होत्या. आता हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. कोनाळ मध्ये मागील वेळी ना.मा.प्र. महिला आरक्षणावर विजयी झालेल्या संजना संदिप कोरगावकर यांच्या गणात आता सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे.
झरेबांबर मध्ये मागील वेळी सर्वसाधारण प्रवर्गातून विजयी झालेले भाजपचे लक्ष्मण नाईक यांना यंदा सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे पत्ता कट झाला आहे.
माटणे मध्ये यापूर्वी भाजपचे भरत जाधव सदस्य होते आणि त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे बाबुराव धुरी विजयी झाले होते. आता हा मतदार संघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे.