आंबोली पोलिसांची कारवाई; संशयितांना पकडण्यासाठी चौकुळ ग्रामस्थांचे सहकार्य…
सावंतवाडी, ता.१४: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करतात आंबोली पोलिसांनी पाठलाग करून कोल्हापूर येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाखाच्या दारूसह पाच लाखाची इनोव्हा कार असा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही दारू पकडण्यासाठी चौकुळ ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य केले. त्या ठिकाणी रस्ता ब्लॉक करून गाडी अडविण्यासाठी मदत केली. सतीश भीमराव आर्दळकर (वय ३७, रा. अडकूर-चंदगड, कोल्हापूर), अविनाश दशरथ पाटील (वय ३२ वर्षे, रा. बोंदुर्डी-चंदगड, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आंबोली चेकपोस्ट येथे पोलीस पथक वाहनांची तपासणी करत होते. यावेळी इनोव्हा गाडी सावंतवाडीकडून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने न थांबता गाडी वेगाने पळवून नेली. यावर पोलिसांनी तातडीने गाडीचा पाठलाग सुरू केला. चौकुळ रस्त्यावर पाठलाग सुरू असताना पोलिसांनी चौकुळ येथील स्थानिक लोकांना रस्ता अडवण्यास सांगितले. स्थानिकांच्या मदतीने अखेरीस ही गाडी थांबवण्यात पोलिसांना यश आले.
गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे २० बॉक्स दारू आढळून आले. ज्यांची किंमत सुमारे १ लाख २ हजार रुपये आहे. दारूसह ५ लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी असा एकूण ६ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांचा पंचनामा करण्यात येऊन गुन्हा नोंद करण्याची व अटकेची कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे, आणि गौरव परब यांचा समावेश होता.