बांधकामच्या अधिकाऱ्यांकडून निकृष्ट कामाची कबुली ; दर्जेदार काम करा, अन्यथा काम बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा इशारा…
मालवण, ता. ४ : तोंडवळी फाटा ते वाघेश्वर मंदिर या रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणाचे निकृष्ट पद्धतीने सुरू असलेले काम आज संतप्त ग्रामस्थांनी दुसऱ्यांदा रोखले. जर काम करायचे असेल तर दर्जेदार करा अन्यथा काम बंद ठेवा असा इशारा तोंडवळी ग्रामस्थांनी दिला.
दरम्यान या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची कबुली बांधकामच्या अभियंत्यांनी दिली. यावेळी संबंधित ठेकेदाराने आपल्याला काही अवधी द्यावा अशी विनंती ग्रामस्थांकडे केली आहे.
तोंडवळी फाटा ते वाघेश्वर मंदिर या रस्त्याच्या खडीकरण, डांबरी करणाचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. या कामाच्या पहिल्याच दिवशी स्थानिक ग्रामस्थांनी काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून देत ते बंद पाडले. त्यानंतर गेल्या काही दिवसात या रस्त्याचे सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंतचे काम करण्यात आले. या कामाच्या पाहणीत स्थानिक ग्रामस्थांना यात डांबराचा वापर झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सरपंच आबा कांदळकर, हर्षल केळुसकर, आनंद खडपकर, सागर मालाडकर भाऊ चोडणेकर, हर्षद पाटील, गणेश तोंडवळकर, दशरथ कोचरेकर, अंकुश तारी, ललित देऊलकर, दत्ता तांडेल, सुधीर पुजारे, आनंद कोचरेकर, भाई आडकर, महेश तारी, आशिष पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत हे काम बंद पाडले.
रस्त्याच्या केलेल्या पाहणीत सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत डांबराचा वापर करण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बांधकामचे अभियंता श्री. कांबळे यांना धारेवर धरत जाब विचारला. यावर झालेल्या कामाच्या पाहणी वरून श्री. कांबळे यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची कबुली दिली. त्यावर जर शासनाचे पैसे असे जर वाया घालवायचे असतील तर काम करून उपयोग काय असा प्रश्न तोंडवळी सरपंच आबा कांदळकर यांनी उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्याचे काम दर्जेदार व्हायला हवे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली. यावर संबंधित ठेकेदाराने आपल्याला काही वेळ द्यावा त्यानंतर हे काम आपण करू असे सांगितले. जोपर्यंत काम दर्जेदार होत नाही तोपर्यंत हे काम बंदच ठेवण्यात यावे अशी सूचना ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारास केली.