प्रांताधिकाऱ्यांसोबत झालेली बोलणी फिस्कटली;आश्वासन नको न्याय देण्याची मागणी…
सावंतवाडी,ता.०५: आंबोली-गेळेतील कबूलायतदार गावकार प्रश्नावरून प्रांताधिकारी व ग्रामस्थ यांच्यात झालेली बोलणी आज फीस्कटली. त्यामुळे ८ तारखेच्या आंदोलनावर आपण ठाम आहोत, येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आम्ही उपोषण करणार आहोत, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. दरम्यान आपल्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, असे आश्वासन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी यावेळी दिले. मात्र यापूर्वी सुद्धा आम्हाला लोकप्रतिनिधींकडून आश्वासन देण्यात आली. त्यामुळे आश्वासन नको, तर न्याय द्या, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.
विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविण्या संदर्भात शासनाला जाग आणण्यासाठी आंबोली ग्रामस्थांच्यावतीने आठ तारखेला येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आमदार दीपक केसरकर यांनी
मुख्यमंत्र्यांकडून हा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन देत आंदोलन करू नका, असे आवाहन गावकऱ्यांना केले होते. परंतु या पार्श्वभूमीवर आज प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी पारवेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत यथोचित तोडगा काढता आला नाही. ग्रामस्थांच्या मते याठिकाणी प्रांताधिकार्यांनी कोणतेही समर्पक उत्तरे दिली नाही. तर हा प्रश्न सुटणार कारवाई सुरू आहे. शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे, अशी उत्तरे देऊन पुन्हा तीच कारणे दिली आहेत. त्यामुळे आम्हाला यावर आता विश्वास नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा यावेळी समितीच्यावतीने शशिकांत गावडे यांनी दिला आहे.