जुन्या सहकाऱ्यांसमवेत सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी…
सावंतवाडी/निखील माळकर,ता.०५: पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या येथील केशवसुत कट्ट्यावरील तुतारीचा लोकार्पण सोहळा आज होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.यावेळी शहरातील उच्चभ्रू लोकांसह सांस्कृतिक,साहित्यिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर,माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर,माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अन्नपूर्णा कोरगावकर यांच्यासह माजी नगरसेवक व अन्य सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीची नांदी या ठिकाणी पाहायला मिळाली.
नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवस श्री साळगावकर हे अज्ञातवासात होते. त्यानंतर ते राजकीय पटलावर पुन्हा आपली ताकद दाखवून देतील का?असा प्रश्न अनेक पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात होता. मात्र मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी केशवसुत कट्ट्यावर असलेली तुतारी जीर्ण झाली होती. ती नव्याने उभारण्याच्या उद्देशाने साळगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन संकल्प सोडला. आज तुतारीचे लोकार्पण होणार आहे. मात्र त्यानिमित्ताने साळगावकरांकडून करण्यात आलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधी होते.