दोडामार्ग,ता.०८: आडाळी येथे रस्ता ओलांडताना कारची धडक बसल्याने नूतन विद्यालय कळणेचा विद्यार्थी मयूर मनोज शेळके (१४ वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी गोवा-आजिलो येथे पाठविण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, आडाळी येथील मयूर हा शाळकरी विद्यार्थी नेहमी प्रमाणे आज सकाळी कळणे येथे शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर एसटी बसची वाट बघत उभा होता. एसटी बस आल्यावर त्याने एसटी बसमध्ये बसण्यासाठी विरुद्ध बाजूला धाव घेतली. त्यावेळी एसटी बसच्या पुढे असलेल्या टाटा एस छोटा हत्ती गाडीला तो आदळला व गाडीच्या दर्शनी भागावर त्याचे डोके आदळले. त्यामुळे तो रस्त्यावर फेकला गेला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपस्थितांनी मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलवून लागलीच त्याला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. यावेळी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले. अपघाताची माहिती कळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.