अँड संग्राम देसाई ; न्यायालयाच्या आदेशानंतर उपजिल्हा रुग्णालयाची समितीकडून पाहणी…
सावंतवाडी ता.०८: मुंबई गोवा महामार्गाच्या अत्यंत जवळ असलेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर आयसीयू सारख्या चांगल्या सुविधा मिळाव्यात हे आमचे समिती सदस्य म्हणून मत आहे.या ठिकाणची पाहणी केल्यानंतर अनेक गोष्टी लक्षात आल्यात. त्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळण्यासाठी सकारात्मक पद्धतीचा अहवाल उच्च न्यायालयासमोर मांडू,असा विश्वास महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य तथा उपजिल्हा रुग्णालय तथ्यशोध समिती सदस्य अँड संग्राम देसाई यांनी आज येथे व्यक्त केला.
दरम्यान ट्रामा केअर सेंटर या ठिकाणी आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली जागा कमी आहे. त्याचबरोबर डाॅक्टरांची अनेक रिक्त पदे असल्यामुळे तांत्रिक जोड असून सुद्धा त्या ठिकाणी सेवा देता येत नाही. तसेच रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या संदर्भात नक्कीच न्यायालयाचे लक्ष वेधू, कोणतीही गोष्ट लपवली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या समितीने आज येथील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर समितीचे सदस्य असलेले श्री. देसाई पत्रकारांची बोलत होते. यावेळी कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील कोल्हापूरचे शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर, डॉ.जयेंद्र परुळेकर,सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवले, गिरीशकुमार चौगुले, पांडुरंग वजराटकर, रवी जाधव, लक्ष्मण कदम आदी उपस्थित होते.
याविषयी देसाई म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार आज आम्ही या ठिकाणी रुग्णालयाची आणि त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली. या पाहणीत अनेक गोष्टीची गरज असल्याचे उघड झाले आहेत. या ठिकाणी रिक्त असलेली डाॅक्टरांची पदे ,अन्य सुविधांचा अभाव त्या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्यामुळे याबाबत आपण नक्कीच न्यायालयाचे लक्ष वेधणार आहोत. या ठिकाणी लोकांना चांगली सेवा मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्या संदर्भात या ठिकाणी आलेली समिती सुद्धा सकारात्मक आहे. जिल्ह्यातील रुग्णांना चांगली सेवा मिळावी. या दृष्टीने माझे प्रयत्न असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मी कोणतीही माहिती लपवणार नाही. जे काही आहे ते न्यायालयासमोर मांडणार आहोत. परंतु ही बाब न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आत्ताच मी काही माहिती उघड करू शकत नाही. तरीही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माहिती नक्कीच मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.