तहसीलदारांना दिले निवेदन; दोषींवर कठोर कारवाईची जिल्हा काँग्रेसची मागणी…
कणकवली, ता. ०८ : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या बुटफेकीचा आज कणकवलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला. तसेच बूट फेकणाऱ्या दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली. या मागणीचे निवेदन काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले.
काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह नागेश मोरये, विनायक मेस्त्री, अनिल डेगवेकर, मनोहर मोरये, राजेंद्र कदम, विजय सावंत, प्रवीण वरूणकर, प्रदीपकुमार जाधव, उन्मेश राणे, राजेंद्र वर्णे, मितेश मालंडकर आदींनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, एका धर्मांध मनुवादी वकिलाने बूट फेकल्याची घटना ही लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारी, लांचनास्पद आणि अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत. तसेच संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
भारत हे लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून, संविधानाने सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे अधिकार दिले आहेत. सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ असून न्यायमूर्ती हे देशाचे सर्वोच्च सन्माननीय व्यक्तिमत्त्व आहे. अशा व्यक्तीवर बूट फेकण्याचे कृत्य हे केवळ न्यायव्यवस्थेचा अपमान नाही, तर भारतीय संस्कृतीतील आदर आणि संयमाच्या परंपरेलाही धक्का देणारे आहे. या घटनेतून काही तथाकथित सनातनी घटकांची असहिष्णु वृत्ती आणि नीच मानसिकता उघड झाली आहे. मतभेद व्यक्त करण्यासाठी संविधानाने शांततामय मार्ग उपलब्ध करून दिलेले असताना हिंसक कृतींचा अवलंब करणे हे लोकशाही संवादावरच घाव घालणारे आहे.